गेल्या महिना दोन महिन्यात झालेल्या आत्महत्यांच्या घटना मला विचार करायला लावत आहेत. पोलीस अधिकारी हिमांशू राय यांनी आजारपणामुळे केलेली आत्महत्या , घरगुती ताण तणावातून केलेली आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांची आत्महत्या आणि अहमदाबाद येथे दोन समलिंगी स्त्रियांनी समाजाच्या वागणुकीला कंटाळून केलेली आत्महत्या.
माणूस जीवनाला का कंटाळतो ? हा खरा प्रश्न . स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेशन केले म्हणजे जीवनाची इतिकर्तव्यता झाल्यावर स्वेच्छेने अन्नपाणी प्रश्न करणे सोडले . ही समजण्यासारखी गोष्ट आहे . पण अकाली मृत्याला कवटाळणे ? आजारपण , घरगुती वाद , प्रेम प्रकरण या मुळे जीव देण्याइतका जीव स्वस्त आहे का ?
माझ्या मते स्व-कर्तृत्वावर जरा जास्तीच विश्वास असणाऱ्या व्यक्तींना जेव्हा अनेक गोष्टी आपल्या हातात नाहीयेत किंवा आपल्या इच्छेप्रमाणे होऊ शकत नाहीत हे लक्षात येते तेव्हा आलेलं वैफल्य असा काही निर्णय घेण्यास भाग पाडते . जग आपल्या मताप्रमाणे नाही तर स्वतःच्या गतीने आणि मतीने चालत असते . आपण या जगातले एक अतिशय छोटेसे अस्तित्व आहोत आणि त्यामुळेच जे समोर येईल ते स्वीकारणे, त्याला तोंड देणे भाग आहे .
अनेकदा अशी निराशाजनक स्थिती आपल्यासमोर उभी राहते . काय करावे याचा मार्ग दिसत नाही काही सुचत नाही . समलैंगिक म्हणून दुहेरी जीवन जगात असताना अशा निराशेच्या गर्तेत सापडलेले अनेक जण आढळतात .
उपाय काय ?
बोला , व्यक्त व्हा , मनातल्या भावनांना मोकळी वाट करून द्या . आपले कुटुंबीय , आई वडील , मित्र हे सगळे आपला आधार आहेत . आपल्या अडीअडचणीला हेच लोक आपला आसरा बनतात . याना आपल्या सुख दुखत सामील करून घ्या . त्यांच्या सुख दुखत तुम्हीही सामील व्हा . कारण ही एकतर्फी प्रक्रिया नसते .
गप्पिष्ट असाल तर बोला , खेळाडू असाल तर भरपूर खेळा , चित्रकार असाल तर चित्र काढा , लेखक असाल तर लिहा ...ज्या प्रकारातून तुम्हाला व्यक्त होता येते ते सर्व करा .
समाज माध्यमांवर अनेक मित्र बनू शकतात. तुम्ही ज्या गोष्टी आपल्या सख्ख्या मित्राला किंवा आई वडिलांना सांगण्यास घाबरता त्या इथे मांडू शकता . इतरांच्या अनुभवातून शिकू शकता . फेक आय डी चा उपयोग स्वतःला व्यक्त करण्यासाठी केलात तर तणावापासून मुक्त तरी रहाल .
आत्महत्येने त्या व्यक्तीचा प्रश्न सुटला असे वाटत असले तरी त्याच्या मागे राहणाऱ्या आई वडिलांचा, पत्नी, मुलाबाळांचा कुठलाच प्रश्न सुटत नाही . उलट त्यात वाढच होते . असे असेल तर आपण काय निर्णय घेतो आहोत याचा माणसाने विचार करावा .
नैराश्य हा एक आजार आहे आणि त्यावर वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत . तुमचे मन सारखेच निराशावादी विचारांनी घेरलेले असेल तर सरळ मनोविकार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार सुरु करा . मनोविकार म्हणजे फक्त वेड लागणे नव्हे तर मनाशी संबंधित कुठलीही अडचण आपण या लोकांकडे मांडू शकतो . त्यांच्या ज्ञायचा उपयोग करून घेऊ शकतो...
मित्रांनी, जीवन ही अतिशय सुंदर देणगी आहे . जीवनात अनेक चांगले लोक भेटतात जे तुमचे जीवन उजळून टाकतात , तुमच्या जीवनाला अर्थ देतात . त्या देणगीचा अपमान करू नका . मस्त जीवन जागा . तुम्ही गे आहात , गे या शब्दाचा अर्थ आहे आनंदी .... आनंदी रहा ..... मस्त जगा
No comments:
Post a Comment