मार्च 2018 मध्ये मी पहिली पोस्ट लिहिली आणि केवळ अकरा महिन्यात या ब्लॉगने एक लाख हिट्स चा एक मोठा टप्पा पूर्ण केला.
तुम्हाला या कथा आवडल्या , अनेकांनी त्या सोशल वेब साईट्स वर शेअर केल्या म्हणून जास्तीत जास्त लोकांना या ब्लॉगची माहिती झाली.तुम्हा सर्वांचे आभार.
या कथा वाचून अनेकांनी त्यांना भेडसावणारे यक्ष प्रश्न माझ्याकडे मांडले.माझ्या कुवतीप्रमाणे मी त्यांना उत्तरे देण्याचाही प्रयत्न केला.सर्व मित्रांचे मानसिक आरोग्य आणि लैंगिक जीवन उत्तम असावे ही तळमळ आहेच.कदाचित याच कारणामुळे गोष्टींच्या ओघात मी काही अश्या मुद्द्यांना स्पर्श करत असतो.
अनेकदा प्रश्न विचारला जातो की या गोष्टी खऱ्या आहेत का? एक मित्राने तर डेव्हीडची गोष्ट वाचून भंडारदरा धरणात कुठली कामे झाली याचा शोध घेतला, राजीवची गोष्ट वाचून एक मित्र लखनऊला गेला तेव्हा मुद्दाम बडा इमामबाडा पाहून आला.
या गोष्टी खऱ्या की खोट्या हा मुद्दा आपण बाजूला ठेवू पण ज्यांच्या बद्दलच्या या गोष्टी आहेत त्यांची खरी ओळख कुणाला कळणार नाही, त्यांची प्रायव्हसी कायम जपली जाईल असा मी प्रयत्न करतो.मग त्यात ठिकाणे, नावे, पार्श्वभूमी असे बदल करावे लागतात. त्यामुळे कृपया कुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका.उगाच कुणा संबंध नसलेल्या व्यक्तीला त्याचा त्रास होऊ शकतो.अश्या बदलांमुळेच, मी , या कथा काल्पनिक असल्याची तळटीप देत असतो. हे सुचवणाऱ्या वाचक मित्राचे इथे आभार मानतो.
अनेकांना मला व्यक्तिशः भेटण्याची इच्छा आहे पण सॉरी.आपल्या सर्वांच्या या दुहेरी आयुष्यात भरपूर कॉम्प्लिकेशन्स आहेत.त्यात भर घालायला नको. मला मेल लिहा, मी रिप्लाय करेन.
या प्रवासात काही चांगले मित्र मिळाले. माझा लाडका लेखक राहुल, राजस, दि-लवर, ला-डिक , पंकज , अनमोल ही त्यातलीच काही नावे. या कथा वाचून एका मित्राने पुन्हा आपली लेखणी उचलावी तर अभिष यादव ने आपला पहिला ब्लॉग लिहिला..
असेच प्रेम करत रहा… उत्तम वाचत रहा… शरीराच्या पलीकडे जाऊन त्या आपुलकीचा, प्रेमाचा शोध घ्या.शेवटी शारीरिक आकर्षण हे क्षणिक असते पण प्रेम चिरंतन राहते.
तुमचा,
बिट्टू
No comments:
Post a Comment