मित्रांनो, आपला ब्लॉग समलैंगिक मित्रांसाठी असला तरीही आपल्या वाचकतील अनेक जण उभयलिंगी आयुष्य जगत आहेत. आपल्या समाजात अजूनही कौमार्य विशेषतः स्त्रीयांचे कौमार्य हा एक महत्वाचा विषय मानला जातो. आपल्या पारंपरिक समजुतीप्रमाणे आपले गैरसमज ही पिढ्यानपिढ्या तसेच चालत आलेले आहेत. डॉक्टर राजन भोसले यांनी लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झालेल्या या लेखात हे गैरसमज दूर केले आहेत. चुकीच्या कल्पनांमुळे अनेक संसार उध्वस्त होऊ शकतात म्हणून हा लेख नक्की वाचा आणि कुणी असे गैरसमज बाळगत असेल तर त्यालाही शहाणे करा. मूळ लेख दैनिक लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. खालील लिंक वर सापडेल.
मुद्दाम डॉक्टर भोसले यांचा ईमेल पण दिला आहे . काही अडचण असल्यास त्यांना संपर्क करू शकता.
डॉ. राजन भोसले (rajanbhonsle@gmail.com)
एका बाजूला आपल्याला मनापासून आवडलेल्या मुलीशी लग्न होणार याची रोमांचक आतुरता, तर दुसरीकडे वडिलांचा कौमार्यपरीक्षेचा अस्वस्थ करणारा कर्मठ अट्टहास. कुबेर एका विचित्र चिंतेने ग्रासला गेला. इंटरनेटवर या समस्येचं उत्तर शोधत असताना अचानक एका ज्येष्ठ लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉक्टरांची एक व्हिडीओ फीत कुबेरच्या पाहण्यात आली आणि त्याने वडिलांशी त्यांची भेट घालून दिली. त्याचा फायदा त्याच्या कुटुंबीयांना झालाच..
द्वारकानाथ जोधपूरमधले एक धनिक जमीनदार. ते स्वत: फारसे शिकले नव्हते, पण त्यांची तिन्ही मुलं शिकली. त्यातला सर्वात लहान मुलगा कुबेर तर मुंबईच्या आय.आय.टी मधून एम.टेक. झाला. दोन्ही मोठय़ा मुलांची लग्नं चौबेंनी स्वत: पुढाकार घेऊन माहितीतल्या स्वजातीय कुटुंबांतल्या मुलींशी केली. जोधपूरमधल्या त्यांच्या आलिशान हवेलीमधे एकत्र कुटुंब पद्धतीनुसार सर्व जण एकत्र राहात होते.
मुंबईत शिकायला गेलेला कुबेर जेव्हा शिक्षण संपवून परतला, तेव्हा त्याच्या लग्नाचा विषय त्याच्या बाबांनी काढला. त्यावर थोडी हिंमत करून कुबेरने मला ‘शहरात शिक्षण झालेली सुशिक्षित मुलगी हवी,’ अशी इच्छा व्यक्त केली. दोन्ही मोठय़ा मुलांची लग्नं जेमतेम शालेय शिक्षण झालेल्या स्वजातीय मुलींबरोबर झाली होती. कुबेरसाठी जातीतल्या, पण सुशिक्षित मुली बघायला सुरुवात केली. अशा मुली त्यांच्या समाजात कमी, त्यामुळे चटकन योग्य स्थळ मिळेना. बरंच थांबून मुंबईत शिकलेल्या एका आर्किटेक्ट मुलीचं स्थळ सुचवलं गेलं. तिचं मूळ कुटुंब राजस्थानी, पण मुलीनं मुंबईत मामाकडे राहून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. दोघांनी एकमेकांना पसंत करताच लग्नाचा मुहूर्त ठरवला गेला.
कुबेर आई-वडिलांपासून आठ वर्षे दूर राहिलेला होता. त्याला आपले आई-वडील काहीसे जुन्या विचारसरणीचे आहेत याची पूर्ण कल्पना होती. जातपात काटेकोरपणं पाळणं, पुरुषप्रधान कुटुंब व्यवस्था मानणं, कर्मकांड, शकून-अपशकून यावर विश्वास ठेवणं अशी त्यांची वैचारिक बैठक होती. कुबेर मात्र यापेक्षा वेगळा, प्रगत विचारसरणीचा होता. लग्न-कार्य अगदी तीन आठवडय़ांवर आलेलं असताना, कुबेरला द्वारकानाथांनी एका खास वैयक्तिक चच्रेसाठी आपल्या दालनात बोलावलं. त्याचं आता लग्न होतंय या पार्श्वभूमीवर काही गोष्टी त्यांना कुबेरला सांगायच्या होत्या. ‘‘तुझी होणारी पत्नी अनेक वर्षे शहरात राहून आली आहे. तिथल्या वातावरणातच तिचं शिक्षण वगरे झालं. मुंबईसारख्या शहरातल्या आई-वडिलांपासून दूर राहणाऱ्या मुली अनेकदा मर्यादा सोडून राहतात व वागतात. चारित्र्य टिकवून राहणं शहरातल्या मुलींना जमत नाही. तुझ्या होणाऱ्या पत्नीबाबतही अशा काही शंकांचा पडताळा आम्हाला करावासा वाटला तर तसा हक्क आम्हाला आहे. शेवटी आमची सून म्हणून ती नांदणार आहे..’’ वडील बरंच काही बोलत होते. वडिलांच्या जुन्या पठडीतून आलेले हे व या प्रकारचे काही साचेबंद विचार आधी त्यांनी कुबेरला बोलून दाखवले. त्यानंतर मात्र वडील जे बोलले ते ऐकून कुबेरचं मन सुन्न झालं. ते म्हणाले, ‘‘लग्नानंतर जेव्हा तू बायकोशी प्रथम शय्यासोबत करशील तेव्हा हे स्पष्ट होईल की, तिने आपलं शील सांभाळलेलं आहे की नाही? की तिने ते शहरात राहत असतानाच गमावलेलं आहे. तुला हे आम्हाला सांगावं लागेल. आपल्या घराण्यात ही प्रथा आम्ही पिढय़ानपिढय़ा पाळत आलो आहोत.’’
वडिलांना नेमकं काय म्हणायचंय हे कुबेरच्या ध्यानात आलं व तो नखशिखांत अस्वस्थ झाला. या गोष्टी कुबेरनं मित्रांकडून यापूर्वी ऐकल्या होत्या. जोधपूरमधेच लहानपण व तारुण्यातली सुरुवातीची काही वर्षे त्यानं घालवली होती. त्या वयात मुलांमधे आपापसात होणाऱ्या गप्पांमधे कुबेरनं हे ऐकलं होतं की, लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा प्रथम समागम होतो व पत्नीचं ‘कौमार्य’ (व्हर्जिनिटी) भंग पावते तेव्हा त्याची परीक्षा तिला समागमानंतर होणाऱ्या रक्तस्रावावरून होत असते. असा रक्तस्राव झाला तर त्याचा अर्थ तिचं कौमार्य अविच्छेदित होतं; पण पहिल्या समागमा दरम्यान रक्तस्राव नाही झाला तर याचा अर्थ तिने यापूर्वीच कधीतरी शारीरिक संबंध केले आहेत व तिने तिचं कौमार्य (व्हर्जिनिटी) गमावलेलं आहे.
आपल्या बायकोच्या कौमार्याबद्दल, प्रथेच्या नावाखाली वडिलांनी दाखवलेली ही उत्सुकता व त्यारूपाने व्यक्त केलेला संदेह कुबेरला अत्यंत अस्वस्थ करून गेला. वडिलांचा कितीही अधिकार असला तरी त्यांनी या प्रकारे आपल्या पत्नीचं चारित्र्य हा उघड चच्रेचा मुद्दा करू नये, असं त्याचं ठाम मत होतं. लग्न झालेल्या पती-पत्नीच्या इतक्या खासगी व नाजूक पलूचा परंपरेच्या नावाखाली असा उघड उच्छेद व ऊहापोह करणं कुबेरला अजिबात रुचलं नाही. पण वडिलांचं वय आणि वचक जाणता त्यांच्याशी वाद घालायचं त्यानं टाळलं.
भावी पत्नीनं कुबेरशी मोकळेपणानं बोलताना, ‘आपण पूर्वी एका ‘रिलेशनशीप’मधे होतो.’ हे सहजपणे स्वत:हून सांगितलं होतं व कुबेरला त्यात कधीच काही आक्षेपार्ह वाटलं नव्हतं. तीन वर्षांपूर्वी पूर्णपणे संपुष्टात आलेलं तिचं ते नातं हा कुबेरला कधीच चर्चेचा मुद्दा वाटला नव्हता. आज आपापसांत एकमेकांशी नवीन नातं जुळवत असताना तिने दाखवलेला उत्साह, सहभाग व तन्मयता कुबेरला भावली होती, म्हणूनच फार खोलात जाऊन त्या जुन्या प्रकरणाला उकरून त्याची फारशी शहानिशा करण्याची त्याला कधी गरजच वाटली नाही. शिवाय कुबेरचंही अगदी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षीच एक हलकं-फुलकं प्रेमप्रकरण होऊन गेलं होतं. त्यामुळे अशा गोष्टींना अवाजवी महत्त्व देण्याचं त्याच्या ध्यानीमनीही आलं नव्हतं. पण आज वडील जे बोलले त्यामुळे त्याच्या मनात काहूर माजलं.
एका बाजूला आपल्याला मनापासून आवडलेल्या मुलीशी आपलं लग्न होणार याची रोमांचक आतुरता, तर दुसरीकडे वडिलांचा अस्वस्थ करणारा कर्मठ अट्टहास. कुबेर विचित्र चिंतेने ग्रासला गेला. इंटरनेटवर या समस्येचं उत्तर शोधत असताना अचानक एका ज्येष्ठ लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉक्टरांची एक व्हिडीओ फीत कुबेरच्या पाहण्यात आली. त्यांनी या विषयावर केलेलं भाष्य ऐकून कुबेरच्या मनात एक कल्पना आली. आपण जे वडिलांना सांगू शकणार नाही ते जर त्यांनी अशा अनुभवी, ज्येष्ठ डॉक्टरांकडून ऐकलं तर त्यांचे विचार, त्यांच्या जुन्या धारणा बदलू शकतील. ही कल्पना मनात येताच कुबेरने त्या डॉक्टरांची माहिती काढली. लग्न दोनच आठवडय़ांवर आलेल्या अवस्थेत असताना कुबेरनं आपल्या स्वत:बद्दल काही लैंगिक तक्रारी आहेत, असं नमूद करून लग्नाआधीच त्या डॉक्टरांकडे जाण्याबाबत वडिलांना सुचवलं.
द्वारकानाथ कुबेरसोबत मुंबईला आले व त्यांनी त्या डॉक्टरांची भेट घेतली. सुरुवातीला कुबेरनं स्वत:च्या मनातली शंका बोलून दाखवली, ‘‘डॉक्टर पहिल्या रात्री स्त्रीची नवऱ्याकडून काय अपेक्षा असते? शारीरिक संबंध करताना आपण कुठे कमी पडू नये यासाठी नेमकं काय करायचं? पहिल्या रात्री खास करण्यासारख्या किंवा खास टाळण्यासारख्या काही गोष्टी आहेत का?’’
खरं तर नेमक्या याच प्रश्नांची उत्तरं कुबेरनं इंटरनेटवरच्या त्यांच्या व्हिडीओमध्ये ऐकली होती, पण वडिलांदेखत ‘स्वत:ची तक्रार वाटेल’ अशी सुरुवात करणं गरजेचं होतं. शिवाय वडील डॉक्टरांच्या समजावण्याच्या पद्धतीने खास प्रभावित व्हावेत, जेणे करून आपल्याला खरोखर हव्या असलेल्या मूळ विषयाला हात घालेपर्यंत त्यांची डॉक्टरांवर श्रद्धा व दृढ विश्वास निर्माण होईल, हा त्यामागचा खरा उद्देश होता. डॉक्टरांनी आपल्या सहज, सोप्या भाषेत, पूर्ण अधिकारवाणीने या विषयावर बोलायला सुरुवात केली. पहिली रात्र व त्या अनुषंगाने त्याचे सर्व पलू एकएक करून चच्रेत येत गेले. अगदी सहजपणे ‘हायमेन’ म्हणजेच स्त्रीच्या योनीमार्गाच्या मुखाशी असलेला ‘कौमार्य पडदा’ यावर चर्चा येऊन ठेपली.
ही वेळ येईपर्यंत झालेल्या चच्रेत डॉक्टरांनी ज्या प्रकारे विज्ञानाचे दाखले देत हे सर्व नाजूकविषय हाताळले होते, त्याने कुबेरचे वडील नक्कीच प्रभावित झाले होते. पुढे अजून डॉक्टर काय सांगणार आहेत याबद्दल त्यांच्याही मनात अगम्य उत्सुकता निर्माण झाली होती. ‘‘हायमेन हा स्त्रीच्या योनीमुखाशी असलेला एक जाळीदार असा तलम पडदा, ज्याला असलेल्या छिद्रांमधून मासिक पाळीचे स्राव वाहू शकतात. पण हा पडदा प्रत्येक स्त्रीमधे जन्मजात असेलच असं नाही. काही स्त्रियांमधे जन्मापासून हा नसतोच, तर काही स्त्रियांमधे तो अतिशय तलम असतो. इतका की, लहानपणी किंवा वाढीच्या वयात कधी खेळताना, धावताना, कवायत, कसरत करताना, कसल्याही त्रासाविना तो नकळत फाटतो. असं होतं तेव्हा अनेकदा रक्तस्रावही होत नाही व किंचित झालाच तर तो निदर्शनास येईलच असं नाही. ज्या स्त्रियांमधे हायमेनचा पडदा आहे व वयात येईपर्यंत तो अजूनही अविच्छेदित आहे, त्यांच्याबाबतीत तो प्रथम समागम करताना फाटू शकतो. त्याने थोडंसं रक्तसुद्धा येऊ शकतं. पण निदर्शनास येणार नाही इतकं किंचित रक्त निघून तो फाटण्याची शक्यताही काही वेळा असते. कधीकधी हा पडदा पातळ तर असतोच पण खूपच लवचिकही असतो, ज्यामुळे इंद्रियप्रवेश होऊनही त्याच्या लवचीकपणामुळे तो ताणला जातो पण लगेच फाटत नाही. त्यामुळेच संभोग होऊनही कसलाही रक्तस्राव होत नाही. असा लवचीक पडदा हळूहळू संबंध येतायेता पूर्णपणे विच्छेदित व्हायला कधी-कधी वेळही लागू शकतो.’’
डॉक्टरांनी दिलेलं हे मुद्देसूद वैज्ञानिक स्पष्टीकरण ऐकून कुबेर व त्याचे वडील काहीसे स्तिमित झाले. स्वत:ला थोडं सावरून द्वारकानाथांनी एक प्रश्न डॉक्टरांना विचारला, ‘‘स्त्रीने तिचं शील जपलं आहे की नाही, हे पडताळून पाहण्याचा काही मार्ग आहे का डॉक्टर?’’ त्यावर डॉक्टर चटकन म्हणाले, ‘‘विश्वास!’’
‘‘जिला आयुष्यभरासाठी आपली जीवनसंगिनी म्हणून स्वीकारायचं तिच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवणं हाच एकमेव मार्ग. एकमेकांवर असा दृढ विश्वास ठेवण्याची तयारी असल्याशिवाय लग्न करूच नये. आज जर दोघांमधे अतूट प्रेम व विश्वासाची जवळीक असेल तर एकमेकांच्या पूर्वायुष्याला संशयाने चाचपडत राहण्याने एकमेकांकडून दुखावलं जाण्याची व एकमेकांपासून दुरावलं जाण्याची शक्यताच जास्त असते. शिवाय आजपर्यंत तथाकथित चारित्र्य सांभाळून राहणारी व्यक्ती उद्या लग्नानंतर चारित्र्य टिकवून राहीलच याची तरी काय खात्री?’’
कुठल्याही व्यक्तीचं मूल्यमापन एका कुठल्या तरी गोष्टीवरून होत नसतं. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकानेक पलू असतात व ते सर्व महत्त्वाचे असतात. त्यामुळे एकदा लग्न निश्चित झालं असेल तर मग व्यक्तीच्या भूतकाळात डोकावत धुंडाळत राहण्यापेक्षा त्यांचं भावी जीवन इथून पुढे कसं उमलत-फुलत जाईल याकडे लक्ष द्यावं. भूतकाळ बदलणं आपल्या हातात नसतं पण भविष्य घडवणं नक्कीच आपल्या हातात असतं.’’ डॉक्टर म्हणाले. डॉक्टरांनी या विषयावर लिहिलेलं पुस्तक त्यांच्याकडून लग्नाची भेट म्हणून कुबेरच्या हातात देत सुहास्य अभिनंदन करत कुबेरला निरोप दिला.
ज्या उद्देशाने कुबेर वडिलांना घेऊन डॉक्टरांकडे आला होता तो सुफळ संपूर्ण झाल्याचा संतोष घेऊन कुबेर वडिलांसह परत आला. कुबेरचं लग्न तर झालंच, पण दोघांनी मिळून सुरू केलेल्या लॅंड डेव्हलिपगच्या नवीन व्यवसायातून त्यांच्या कुटुंबाने काही वर्षांतच भरभराटीची नवीन शिखरं गाठली. आपल्या आर्किटेक सुनेनं या नव्या व्यवसायात कुबेरला बरोबरीने साथ दिली याचं त्याच्या वडिलांना आज खूप कौतुक आहे.
अनेकदा नवीन पिढीतली मुलं नवे विचार, विचार करण्याची नवीन पद्धत व ऑफबीट कल्पना घेऊन येतात. त्यांना आपल्या मावळत्या कालबाह्य़ धारणांमधे जखडण्यापेक्षा त्यांच्या उगवणाऱ्या भविष्यवादी संकल्पनांना प्रोत्साहन देणंच योग्य, हे या लेखाद्वारे पालकांना दिलेलं आव्हान नव्हे तर एक प्रगत आवाहन आहे असं वाचकांनी मानावं.
(हा लेख पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित आहे, पण गोपनीयतेच्या उद्देशाने नाव व काही तपशील बदललाय.)
rajanbhonsle@gmail.com
No comments:
Post a Comment